दुचाकी चोर १२ तासांत अटकेत

क्राईम

प्रतिनिधी

रस्त्यालगत उभी केलेली दुचाकी चोरून तिची विक्री करणाऱ्या दोन सराईत आरोपींना मुलुंड पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातील दोन दुचाकींसह एक रिक्षा हस्तगत केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मुलुंडच्या इंदिरानगर येथे राहणारे हरीश सिंधराजन यांनी ९ मार्च रोजी त्यांची दुचाकी घराजवळ उभी केली होती. मात्र अज्ञात चोरांनी ही दुचाकी घेऊन पोबारा केला. याबाबत हरीश यांनी मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करून परिसरातील काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण ताब्यात घेतले. यावेळी काही जण एका रिक्षाला बांधून ही दुचाकी घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी रिक्षाचा शोध सुरू केला. ही रिक्षा गोवंडी परिसरातील असल्याचे उघड होताच पोलीस पथक तेथे दाखल झाले.

संशयीत रिक्षा परिसरातून जात असताना पोलिसांना दिसली. पोलिसांनी रिक्षाचा पाठलाग करून गोवंडी शिवाजी नगर येथून आवेश कुरेशी (१९) आणि मेहफुज शेख (२१) या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीमध्ये या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातील एक रिक्षा आणि दोन दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या.