प्रतिनिधी
चार गुंठे तिही अतिक्रमित जमिनीच्या वादातून लहान भावावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. उपचारादरम्यान त्याचा आज मृत्यू झाला. याप्रकरणी आता हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहापायी माणूस कोणत्या थराला जातो, याचे प्रत्यय असलेल्या साखरखेर्डा येथील या घटनेने सिंदखेडराजा तालुका हादरला आहे.
साखरखेर्डा ते मेहकर मार्गावरील सांवगी टी-पॉईंटवर टाले बंधूंचे वडिलोपार्जित शेत असून त्याच शेतात ७ भावंडे कुटुंबीयांसह वास्तव्यास आहे. त्यापैकी हरीराम, पांडुरंग आणि एकनाथ टाले हे तीन भाऊ त्याच ठिकाणी जय मल्हार ढाबा चालवितात. १९ एप्रिलच्या सकाळी देवीदास टाले व त्याची दोन मुले पवन आणि श्रीकृष्ण यांनी लहान भाऊ एकनाथ सीताराम टाले यास लोखंडी रॉड आणि फायटरने बेदम मारहाण केली. पांडुरंग आणि हरीराम टाले भांडण सोडविण्यास गेले असता देवीदास व त्याच्या मुलांनी त्यांच्यावरही हल्ला केला. मारहाणीत एकनाथ आणि हरीराम टाले हे दोघे भाऊ गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील एकनाथ टाले यांचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला.
टाले यांच्या वडिलोपार्जित जमिनीची सातही भावांत समान वाटणी झालेली आहे. महालक्ष्मी तलावाला लागून काही अतिक्रमित जागा आहे. त्यातील ४ गुंठे जमीन ही देवीदास व त्याच्या मुलांना हवी होती. पांडुरंग, हरीराम व एकनाथ यांचा त्याला विरोध होता. याच रागातून देवीदासने आपल्या पवन व श्रीकृष्ण या मुलांच्या मदतीने आपल्या सख्ख्या भावाचा काटा काढला. पोलीस निरीक्षक स्वप्नील नाईक यांनी नव्याने कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला. यापूर्वी मारहाणप्रकरणी तिघा पिता-पुत्रांवर ३०७, ३२३, ३२४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. आरोपी देवीदास सीताराम टाले, पवन देवीदास टाले आणि श्रीकृष्ण देवीदास टाले या तिघा पिता-पुत्रांना अटक करण्यात आली आहे.