मतदान सुरू असतानाच बॉम्बस्फोटाची धमकी; पत्नीला नांदायला येत नसल्याने नियंत्रण कक्षाला दूरध्वनी

क्राईम

प्रतिनिधी

लोकसभेचे मतदान सुुरू असताना शहरात बाॅम्बस्फोट घडविण्यात येणार असल्याचा दूरध्वनी पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला करण्यात आला. धमकीच्या दूरध्वनीमुळे बंदोबस्तात असलेल्या पोलिसांची धावपळ उडाली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तेव्हा पत्नीला नांदायला येत नसल्याने एकाने रागाच्या भरात नियंत्रण कक्षाला दूरध्वनी केल्याचे निष्पन्न झाले.

पोलीस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून दिशाभूल केल्याप्रकरणी एकाविरुद्ध रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. एकाचा पत्नीशी वाद झाला होता. वादानंतर पत्नी माहेरी निघून गेली होती. पत्नी नांदायला येत नसल्याने त्याने पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला सोमवारी दुपारी दूरध्वनी केला. शहरात सात ठिकाणी बाॅम्बस्फोट घडविण्यात येणार असल्याची धमकी त्याने नियंत्रण कक्षाला दिली. नियंत्रण कक्षाला याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची धावपळ उडाली.

पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. याबाबतची माहिती बंदोबस्तावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कळविण्यात आली. मतदानाच्या बंदोबस्तात गुंतलेल्या पोलिसांची धावपळ उडाली. पोलिसांनी तातडीने तपास केला. तांत्रिक तपासात दूरध्वनी करणाऱ्याचे नाव निष्पन्न झाले.