प्रतिनिधी
वानवडीतील महंमदवाडी परिसरात असलेल्या सराफी पेढीवर भरदिवसा दरोडा घालण्यात आला. शस्त्राच्या धाकाने पेढीतील दागिने लुटून चोरटे पसार झाले. भरदिवसा दरोडा पडल्याने परिसरात खळबळ उडाली.महंमदवाडी रस्त्यावरील वाडकर मळा परिसरात बी. जी. एस. ज्वेलर्स सराफी पेढी आहे. शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास चोरटे खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीत शिरले. चोरट्यांनी सराफी पेढीचे मालक आमि कर्मचाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखविला. जीवे मारण्याची धमकी देऊन सराफी पेढीतील दागिन्यांची लूट करून चोरटे पसार झाले. सराफी पेढीत दरोडा पडल्याची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात घबराट उडाली.
या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे, परिमंडळ पाचचे उपायुक्त आर. राजा यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी चोरट्यांचा माग काढण्याचे आदेश तपास पथकाला दिली. चोरटे दुचाकीवरुन पसार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी हडपसर, वानवडी, कोंढवा परिसरात नाकाबंदी करुन संशयित वाहनांची तपासणी सुरू केली. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून, चोरट्यांनी चेहरे रुमालाने झाकल्याचे दिसून आले आहे.