थेऊर फाटा परिसरात ज्येष्ठ महिलेला मारहाण करून दागिन्यांची लूट;

क्राईम

प्रतिनिधी

पुणे-सोलापूर रस्त्यावरील थेऊर फाटा परिसरात शनिवारी पहाटे चोरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेला तलवारीने धाक दाखवून १६ तोळे सोन्याचे दागिने लुटून नेल्याची घटना घडली. चोरट्यांनी परिसरातील घरांना बाहेरून कड्या लावल्या होत्या. त्यामुळे ग्रामस्थ मदतीला बाहेर पडू शकले नाहीत. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ महिला मूळच्या मुंबईच्या आहेत. त्यांचे थेऊर फाटा येथील आंबेकर मळ्यात फार्म हाउस आहे. त्या फार्म हाउसवर नियमित येतात.

शुक्रवारी (२३ मे) त्या फार्म हाउसवर मुक्कामी होत्या. त्या आणि घरकामास असलेली मुलगी घरात झोपल्या असताना, पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास घरातील स्वयंपाकघराच्या खिडकीची जाळी तोडून चोरटे आत शिरले. चोरट्यांनी परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या घरांच्या कड्या बाहेरून लावून घेतल्या होत्या. ज्येष्ठ महिलेच्या घरातील बल्ब काढून टाकले होते. त्यामुळे घरात अंधार होता. चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेला झोपेतून जागे केले. त्यानंतर त्यांना मारहाण केली. त्यांना तलवारीचा धाक दाखवून बांगड्या, गळ्यातील दागिने असे १६ तोळे सोन्याचे दागिने लुटून नेले. त्यांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला.या घटनेची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला देण्यात आली. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट सहाचे पथक आणि लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ‘चोरट्यांनी चेहरे रुमालाने झाकले होते, ते हिंदीत बोलत होते,’ अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे तपास करत आहेत.